जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या सक्त सूचनांनुसार मध्यरात्रीपर्यंत सर्च ऑपरेशन; वाळू तस्करांवर प्रशासनाची करडी नजर
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या स्पष्ट व सक्त सूचनांनुसार नेवासा महसूल विभागाने अवैध वाळू उपशाविरोधात मोठी धडक कारवाई करत नदीपात्रातून तब्बल ७० अवैध तराफे जप्त करून ते नष्ट केले. या कारवाईत सुमारे २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आगीच्या भक्ष्यस्थानी घालण्यात आला आहे. नेवासा बुद्रुक येथील नदीपात्रात काल सकाळी ११ वाजल्यापासून ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत विशेष ‘सर्च ऑपरेशन’ राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे अवैध तराफे व चप्पू शोधून काढण्यात आले. सर्व साहित्य नदीकाठावर आणून नियमानुसार नष्ट करण्यात आले.
नष्ट करण्यात आलेल्या साहित्यामध्ये एकूण ७० अवैध तराफे / चप्पू यांचा समावेश असून, एका तराफ्याची अंदाजे किंमत सुमारे ४० हजार रुपये आहे. त्यानुसार एकूण सुमारे २८ लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत नष्ट करण्यात आला आहे. नदीपात्रातील कारवाई प्रभावीपणे पार पाडण्यासाठी श्रीरामपूर येथून विशेष बोट व पथक पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या सहकार्यामुळे ही मोहीम यशस्वीरीत्या पार पडली.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभारी तहसीलदार हिमालय घोरपडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत व नेतृत्वाखाली करण्यात आली. संबंधित महसूल अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. अवैध गौण खनिज उत्खनन व वाळू तस्करीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून अशा गैरप्रकारांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येतील आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
