दिनांक.14/02/2026 शनिवार
आई-वडिलांच्या चरणी नतमस्तक होत चिमुकल्यांनी दिला ‘मातृ देवो भव: पितृ देवो भव:’चा संदेश — यशवंतराव होळकर पब्लिक स्कूलचा संस्कारक्षम उपक्रम
मांचीहील (संगमनेर) : सचिन उपाध्ये
आज १४ फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र ‘वेलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. मात्र यशवंतराव होळकर पब्लिक स्कूल, मांचीहील येथे या दिवसाला एक वेगळे आणि संस्कारक्षम रूप देत ‘मातृ-पितृ पूजन सोहळा’ अत्यंत भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. आधुनिक संस्कृतीच्या प्रभावाखाली हरवत चाललेल्या कौटुंबिक मूल्यांना नवसंजीवनी देणारा हा उपक्रम उपस्थित सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला.

या प्रसंगी चिमुकल्या बालकांनी आपल्या आई-वडिलांचे तसेच शिक्षक-शिक्षिकांचे विधीवत पूजन करून “मातृ देवो भव:, पितृ देवो भव:” अशा घोषणांनी संपूर्ण शाळा परिसर दणाणून सोडला. आपल्या निरागस वाणीतील भाषणातून त्यांनी आई-वडिलांचे महत्त्व अतिशय प्रभावीपणे मांडले. काही बालकांनी आई-वडिलांविषयी व्यक्त केलेल्या भावना ऐकून उपस्थित पालकांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. यावेळी अनेक मातांच्या व शिक्षिकांच्या डोळ्यांतही भावनांचे काहूर पाहायला मिळाले.

या सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केलेला छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. आई-वडिलांच्या त्यागावर आधारित गीत, नृत्य, नाट्यछटा आणि मनोगत सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय व भावनिक झाले होते. “आई-वडील म्हणजे देव” ही भावना प्रत्येक सादरीकरणातून ठळकपणे दिसून येत होती.

कार्यक्रमानंतर अनेक पालकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आज आमच्या मुलांच्या तोंडून आई-वडिलांचे महत्त्व ऐकताना डोळे भरून आले. धावपळीच्या जीवनात आपण नकळत दुर्लक्ष करतो, पण अशा कार्यक्रमांमुळे मुलांमध्येच नव्हे तर आमच्यातही संस्कार जागृत होतात. शाळेने केलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.”
शिक्षिकांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “लहान वयातच संस्कारांची पेरणी झाली तरच पुढील पिढी सुसंस्कृत घडेल. आजच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी जी संवेदनशीलता दाखवली, ती समाजासाठी आशादायी आहे.”

डायरेक्टर आढाव सर यांनी आपल्या मनोगतात मातृ-पितृ पूजनाचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दांत विशद केले. ते म्हणाले, “आपली भारतीय संस्कृती ही कुटुंबव्यवस्थेवर आधारलेली आहे. एकत्र कुटुंब पद्धत ही आपल्या देशाची ओळख आहे. परकीय संस्कृतीचे अनुकरण न करता आपण आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत. आई-वडिलांची किंमत पैशात मोजता येत नाही. बाजारात सर्व काही मिळू शकते, पण आई-वडील नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी खर्च केलेले असते. त्यामुळे आई-वडील हेच आपले खरे दैवत आणि आपले संपूर्ण विश्व आहे.”
ते पुढे म्हणाले,“गणपती बाप्पांनी आपल्या आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून सांगितले की, माझ्या आई-वडिलांतच संपूर्ण विश्व सामावले आहे. हाच संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपल्या उतारवयात आई-वडिलांना वृद्धाश्रमात न पाठवता, स्वतः त्यांची सेवा व काळजी घेणे हीच खरी भक्ती आहे.”

यशवंतराव होळकर पब्लिक स्कूलने केवळ शैक्षणिक प्रगतीवरच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि मूल्याधारित शिक्षणाचे सातत्याने आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून हा मातृ-पितृ पूजन सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
वेलेंटाईन डेच्या झगमगाटात हरवणाऱ्या समाजाला आई-वडिलांचे खरे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित करणारा हा कार्यक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. चिमुकल्यांच्या निरागस भावना, पालकांचे भरलेले डोळे आणि शिक्षकांची समाधानी हसू यामुळे हा दिवस यशवंतराव होळकर पब्लिक स्कूलसाठी अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व मान्यवरांनी दोन मिनिटांचे मौन पाळून देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांना नमन केले. यावेळी संपूर्ण परिसर गंभीर व भावनाविवश वातावरणाने भारावून गेला.
श्रद्धांजलीनंतर सर्वांनी एकत्रितपणे ‘पसायदान’ म्हणत विश्वशांती, सद्बुद्धी आणि मानवकल्याणाची प्रार्थना केली. पसायदानाच्या मंगल सुरांनी कार्यक्रमाचा अत्यंत सकारात्मक, शांततामय आणि प्रेरणादायी समारोप झाला.

यशवंतराव होळकर पब्लिक स्कूलने केवळ शैक्षणिक प्रगतीवरच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत मूल्याधारित शिक्षण, सामाजिक भान आणि राष्ट्रप्रेम जोपासण्याचा आदर्श उपक्रम राबविला आहे. मातृ–पितृ पूजन, शहीद जवानांना श्रद्धांजली व पसायदान या त्रिसूत्रीमुळे हा कार्यक्रम संस्कार, कृतज्ञता आणि राष्ट्रभक्तीचा त्रिवेणी संगम ठरला.
वेलेंटाईन डेच्या गोंगाटात हरवणाऱ्या समाजाला भारतीय संस्कृतीची खरी ओळख करून देणारा हा उपक्रम उपस्थित प्रत्येकाच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असा भावनिक ठसा उमटवून गेला.
