नेवासा तालुक्यात वाळू तस्करांवर प्रशासनाचा ‘प्रहार’ सुरूच

सलग दुसऱ्या दिवशी ४४ अवैध तराफे जाळून नष्ट

नेवासा : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

नेवासा तालुक्यात अवैध वाळू उपशाविरोधात जिल्हा प्रशासनाने सुरू केलेली धडक मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही प्रभावीपणे राबविण्यात आली. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने प्रवरा नदीपात्रातील विविध ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध तराफे व साहित्य जप्त करून जागीच नष्ट केले.
आज दिवसभरात तीन टप्प्यांत ही कारवाई करण्यात आली. पहिल्या टप्प्यात नेवासा खुर्द येथील ज्ञानेश्वर मंदिर व लाडमोड टेकडी परिसरात प्रवरा नदीच्या काठावर ३६ थर्माकोलचे चप्पू तसेच ५० लाकडी बल्ल्या जप्त करून नियमानुसार जाळून नष्ट करण्यात आल्या.

दुसऱ्या टप्प्यात नदीपात्रातील अन्य एका ठिकाणी ४ थर्माकोलचे चप्पू नष्ट करण्यात आले. तर तिसऱ्या टप्प्यात कापूर डोह परिसरात ४ चप्पू व १६ लाकडी बल्ल्या जप्त करून जाळून खाक करण्यात आल्या. या संपूर्ण मोहिमेत एकूण ४४ अवैध तराफे / चप्पू तसेच मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्य नष्ट करण्यात महसूल विभागाला यश आले आहे.

कारवाईदरम्यान वापरण्यात येणाऱ्या बोटीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने खोल पाण्यातील कारवाई काही प्रमाणात मर्यादित ठेवावी लागली. तथापि नदीकाठावरील व उथळ पाण्यातील सर्व अवैध साधनांचा पूर्णपणे बिमोड करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. अवैध गौण खनिज उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. वाळू तस्करीविरोधात प्रशासनाचा कडक ‘वॉच’ कायम राहणार असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशारा महसूल विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!