दिनांक.16 फेब्रुवारी 2026 सोमवार
‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ 19 फेब्रुवारीला रंगणार!
“40 कलाकारांचे नेत्रदीपक सादरीकरण, शिवचरित्र, सामाजिक वास्तव आणि प्रेरणादायी संदेशांचा संगम – प्रवेश सर्वांसाठी मोफत”
संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, संपूर्ण जगाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गुरुवार, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह, संगमनेर येथे ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्यातून इतिहास आणि वर्तमान काळाची प्रभावी सांगड घालण्यात येणार असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.
या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र हे केवळ इतिहास नसून ते पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचे सांगताना आयोजकांनी नमूद केले की, या महानाट्यातून शिवचरित्रासोबतच आजच्या सामाजिक वास्तवावरही प्रभावी भाष्य करण्यात येणार आहे. प्राध्यापक प्रकाश वाघमारे लिखित आणि संगमनेरचे सुपुत्र डॉ. सागर फापाळे यांनी साकारलेल्या महाराजांच्या प्रमुख भूमिकेमुळे हे महानाट्य राज्यभर लोकप्रिय ठरले आहे.
सुमारे 40 कलाकारांच्या सशक्त संचामधून सध्याची सामाजिक स्थिती, भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षितता, तरुण पिढीसमोरील आव्हाने, व्यसनाधीनता, जातीय सलोखा आदी महत्त्वाच्या विषयांना कलात्मक पद्धतीने सादर करण्यात येणार आहे. या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ साहेब, बाल शिवाजी, राज्याभिषेक सोहळा, मुघलांशी झालेली युद्धे, मर्दानी खेळ, नेत्रदीपक आतिषबाजी आणि भव्य दृश्यरचना हे विशेष आकर्षण ठरणार आहे.
हे महानाट्य सर्व नागरिकांसाठी मोफत खुले असून, संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवविचारांना अभिवादन करावे, असे आवाहन जयहिंद लोकचळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.
