“नाशिक–पुणे रेल्वे मार्गावर संभ्रम का? पालकमंत्र्यांनी सुचविलेला नेमका कोणता मार्ग – थोरातांचा थेट सवाल”

दिनांक : 16 फेब्रुवारी 2026

“तीन मार्गांपैकी कोणता नकाशा रेल्वेमंत्र्यांसमोर ठेवला? संगमनेरच्या जनतेसमोर सत्य मांडण्याची बाळासाहेब थोरात यांची ठाम मागणी”

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावर निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांना नेमका कोणता मार्ग सुचविला, याची स्पष्ट माहिती जनतेसमोर मांडावी, अशी ठाम मागणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्याचे समोर आले असून, त्या भेटीत नेमकी कोणती भूमिका मांडण्यात आली आणि कोणत्या मार्गाचा नकाशा दाखविण्यात आला, हे जाहीर करणे आवश्यक असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

संगमनेर येथे माध्यमांशी संवाद साधताना थोरात यांनी नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. 2020 नंतर या प्रकल्पाला गती देण्यात आली असून, फेब्रुवारी 2020 मध्ये सेंट्रल रेल्वेकडून प्रकल्पाचा डीपीआर मंजूर झाला होता. त्यानुसार नाशिक – सिन्नर – संगमनेर – साकूर – आळेफाटा – नारायणगाव – मंचर – राजगुरुनगर – चाकण – आळंदी – हडपसर – पुणे असा सरळ आणि व्यवहार्य मार्ग निश्चित करण्यात आला होता. या मार्गासंदर्भात विविध स्तरांवर बैठका होऊन मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली होती आणि भूसंपादन प्रक्रियाही सुरू झाली होती.

या संपूर्ण प्रक्रियेत सरकारने मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली असून, मार्ग ठरवताना सर्व अडचणींचा सखोल अभ्यास करण्यात आल्याचे थोरात यांनी नमूद केले. असे असताना अचानक मार्ग बदलाचा मुद्दा पुढे आणण्यामागील नेमके कारण काय, हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी मंजूर झालेल्या सरळ मार्गामुळे नाशिक आणि पुणे थेट जोडले जाणार होते, जे या भागाच्या औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सध्याच्या घडीला तीन संभाव्य मार्ग चर्चेत असल्याचे सांगताना थोरात म्हणाले की, त्यापैकी दोन मार्ग संगमनेर आणि अकोले तालुक्यातून जातात, तर तिसरा मार्ग शिर्डीमार्गे प्रस्तावित आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर नेमका कोणता मार्ग मांडला, याची स्पष्टता होणे आवश्यक आहे. कोणत्या मार्गाचा पाठपुरावा केला जात आहे, त्याचा नकाशा संगमनेर तालुक्यातील जनतेसमोर ठेवावा, जेणेकरून संभ्रम दूर होईल, अशी मागणीही त्यांनी केली.

संगमनेरची रेल्वे ही येथील जनतेच्या अस्मितेचा आणि भविष्यातील विकासाचा प्रश्न असल्याचे सांगत, आज योग्य निर्णय झाला नाही तर पुढील अनेक दशके हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमी असल्याचा इशाराही थोरात यांनी दिला. त्यामुळे मार्गाबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

मूळ मार्गाने रेल्वे ही सर्वांसाठीच लाभदायक
मुंबई – नाशिक – पुणे हा राज्याचा महत्त्वाचा विकास त्रिकोण आहे. उद्योग, रोजगार आणि लोकसंख्या या सर्व बाबतीत हा भाग आघाडीवर आहे. नाशिक आणि पुणे थेट रेल्वेमार्गे जोडणे ही या परिसराच्या व्यापारी, कृषी आणि सामाजिक विकासाची गरज आहे. सरळ मार्गाऐवजी वळणदार मार्ग स्वीकारणे हे विकासाच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही, असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

रेल्वे हा राजकारणाचा नाही, भविष्याचा विषय
रेल्वे प्रकल्प हा राजकारणासाठी नव्हे, तर भविष्यासाठी आहे. आज निर्णय झाला नाही तर पुढील अनेक वर्षे हा प्रकल्प प्रत्यक्षात येणार नाही. त्यामुळे हा विषय राजकीय रंग देण्याऐवजी परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पाहावा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!