टाकाऊपासून टिकाऊ’ संकल्पनेतून प्रवरा विद्यार्थ्यांची गो-कार्ट निर्मिती – आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धावणार!

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या अभिनव संकल्पनेवर आधारित गो-कार्ट वाहनाची यशस्वी निर्मिती करत नवोपक्रमाचा आदर्श निर्माण केला आहे. अत्यल्प खर्चात, स्वतःच्या कल्पकतेतून आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर विकसित केलेले हे गो-कार्ट वाहन आता कोयंबतूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोटर स्पोर्ट्स स्पर्धेत धावणार आहे.

विद्यार्थ्यांनी ‘मेक इन इंडिया’ या राष्ट्रीय संकल्पनेतून प्रेरणा घेत या प्रकल्पाची संकल्पना, डिझाइन, प्रत्यक्ष निर्मिती आणि चाचणी अशा सर्व टप्प्यांवर मेहनतीने काम केले. तब्बल २४ विद्यार्थ्यांच्या संघाने सातत्यपूर्ण प्रयत्न, संशोधन आणि प्रयोगातून हे वाहन तयार केले असून, त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे आणि सर्जनशीलतेचे हे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.

या उपक्रमाला प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, प्राचार्य डॉ. गुलाणे आणि विभागप्रमुख डॉ. पी. डी. काबुडके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी तांत्रिक नियोजन, संसाधन व्यवस्थापन आणि प्रकल्प समन्वय साधत विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले. तसेच मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ.मिलिंद म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

या विद्यार्थी संघाचे नेतृत्व कॅप्टन साईनाथ ढगे आणि उपकप्तान कुणाल गाडेकर यांनी प्रभावीपणे सांभाळले. संघातील सर्व सदस्यांनी परस्पर सहकार्य, शिस्त आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर प्रकल्प यशस्वी करून दाखवला.

गो-कार्ट वाहनाच्या निर्मितीद्वारे विद्यार्थ्यांनी केवळ अभियांत्रिकी कौशल्य नव्हे, तर नवोन्मेष, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि स्वदेशी उत्पादनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. हा उपक्रम भविष्यातील अभियंत्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा असून, प्रवरा शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे उत्तम उदाहरण आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक आणि संस्थेचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!