खासगी मध्यस्थांमार्फत सुरू होती लाचखोरी; तहसील परिसरात सापळा रचून एसीबीची धडक कारवाई – महसूल विभागात खळबळ
संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील तलाठ्याला खासगी व्यक्तींच्या माध्यमातून १३ हजार रुपयांच्या लाचेपैकी ६ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दुपारी सापळा रचून रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईत तलाठ्यासह दोन खासगी मध्यस्थांनाही अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबीच्या या धडक कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांना स्वतःचा कुणबी जातीचा दाखला तसेच कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र काढायचे होते. या कामासाठी आश्वी बुद्रुक येथील तलाठी बाबासाहेब बोऱ्हाडे यांनी तक्रारदाराकडे आधीच आर्थिक मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराकडून यापूर्वी १३ हजार रुपये घेतल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यानंतरही तलाठ्याने तक्रारदाराच्या बहिणीचा कुणबी जातीचा दाखला व कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी पुन्हा ६ हजार व ७ हजार रुपये, अशी एकूण १३ हजार रुपयांची नवीन मागणी केली होती.
वारंवार होत असलेल्या या आर्थिक मागण्यांमुळे तक्रारदार प्रचंड त्रस्त झाला होता. शासकीय कामासाठी वारंवार लाच मागितली जात असल्याने अखेर तक्रारदाराने अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर एसीबी पथकाने नियोजनबद्ध सापळा रचण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी संगमनेर तहसील कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी तलाठी बोऱ्हाडे यांच्यासाठी खासगी व्यक्ती हितेश घोडेकर याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारून ती प्रतीक कातोरे याच्याकडे सुपूर्द केली. या संपूर्ण व्यवहारावर दबा धरून नजर ठेवून असलेल्या एसीबी पथकाने योग्य क्षणी कारवाई करत तलाठी बाबासाहेब बोऱ्हाडे, हितेश घोडेकर आणि प्रतीक कातोरे या तिघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले.
या कारवाईत लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, पंचनामा करण्यात आला आहे. एसीबी पथकाने संबंधितांचे मोबाईल, कागदपत्रे व व्यवहारा संदर्भातील इतर पुरावे ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई नाशिक परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड व चालक हारूण शेख यांचा समावेश होता.
दरम्यान, तलाठी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे (वय ५७), हितेश सोमनाथ घोडेकर (रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर) आणि प्रतीक विजयकुमार कातोरे (रा. सांगवी, ता. संगमनेर) यांच्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ (अ) व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे या करीत आहेत.
या धडक कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या लाचखोरीविरोधात कडक संदेश गेला असून, नागरिकांनीही अशा प्रकारच्या अन्यायाविरोधात निर्भीडपणे तक्रार करावी, असे आवाहन एसीबी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
