दिनांक. 27 फेब्रुवारी 2026
कविता, गोष्टी, फलक वाचन व उपक्रमांनी रंगला मराठी भाषेचा गौरव सोहळा
पानोडी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
मराठी भाषेचा गौरव विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यासाठी बालपण स्कूल, पानोडी येथे मराठी राजभाषा दिन अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि समाजाशी थेट संवाद साधणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी केवळ शाळेच्या आवारात न थांबता परिसरातील विविध गावांमध्ये जाऊन दुकानांवरील मराठी फलकांचे वाचन करत मराठी भाषेचा जागर केला.

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी दाढ बुद्रुक, प्रतापपूर, डिग्रस, मालुंजे, शेडगाव व हंगेवाडी या गावांतील दुकानांना भेट देत मराठी भाषेतील फलकांचे वाचन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी दुकानदारांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देत संवाद साधला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला तसेच समाजाशी संवाद साधण्याचे कौशल्य विकसित झाले.

एलकेजी व युकेजीच्या चिमुकल्यांनी शाळेच्या परिसरात मुळाक्षरे तसेच दोन ते तीन अक्षरी शब्दांचे वाचन व लेखन करत मराठी भाषेची ओळख करून घेतली. विविध शैक्षणिक खेळ, चित्रफलक व कृती उपक्रमांच्या माध्यमातून लहान वयातच भाषिक संस्कार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी कविता लेखन व वाचन, गोष्टी कथन, भाषिक खेळ आदी उपक्रमांतून मराठी भाषेप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांतून मराठी भाषेचे सौंदर्य, समृद्धी व संस्कृती प्रभावीपणे अधोरेखित झाली.

शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये असलेली आपुलकी आणि आत्मीयता विशेष उल्लेखनीय ठरली. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत असून समाजात मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. या उपक्रमाचे परिसरातील नागरिक, पालक व दुकानदारांनी मनापासून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी समाजात जाऊन मराठी फलकांचे वाचन करणे हा उपक्रम प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी बालपण स्कूलच्या प्रमुख सौ. सोनाली मुंढे मॅडम म्हणाल्या, “मराठी ही आपली मायबोली असून तिचा सन्मान व अभिमान विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य, आत्मविश्वास व सामाजिक जाणीव वाढते. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील.”
