रखडलेले प्रश्न मिटले! १५०० दाखले एका झटक्यात! डॉ. मैथिलीताई तांबेंचा मोठा निर्णय!

दिनांक. 27 फेब्रुवारी 2026 शुक्रवार

प्रलंबित अर्जांचा तात्काळ निपटारा; नागरिकांना मोठा दिलासा

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

प्रशासकीय कालखंडात अनेक दिवस रखडलेल्या जन्म व मृत्यू दाखल्यांच्या प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करत नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे १५०० जन्म-मृत्यू दाखल्यांचे वितरण करण्यात आले. या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी नागरिकांना जलद व सुलभ सेवा मिळावी यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. प्रशासकीय राजवटीच्या काळानंतर नव्याने पदभार स्वीकारताना विविध विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत होता. याचा परिणाम जन्म-मृत्यू विभागातील कामकाजावर दिसून येत होता.

जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असल्यामुळे नागरिकांची सतत गर्दी होत होती. वेळेवर दाखले न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती तसेच काही वेळा कर्मचारी व नागरिकांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी तातडीने पुढाकार घेत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत शहरातील रुग्णालयांमध्ये जन्म झालेल्या बालकांची तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तींची नोंदणी जलदगतीने पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सुमारे १५०० प्रलंबित दाखल्यांचे नोंदणीकरण करून त्यांचे त्वरित वितरण करण्यात आले.

नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी भविष्यात अशा प्रकारची प्रलंबित प्रकरणे निर्माण होऊ नयेत यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या असून नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले तातडीने मिळतील याची व्यवस्था कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या तत्पर व लोकाभिमुख कार्यपद्धतीबद्दल संगमनेर शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!