दिनांक.10/01/2026. मंगळवार
प्रदेशाध्यक्ष नारायण ढेबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; पत्रकारांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा
शिर्डी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
श्री साईबाबांच्या पावनभूमीत पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या नावलौकिक संघटनेची राज्य कमिटी तसेच राज्यातील विभागीय आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. प्रदेशाध्यक्ष नारायण ढेबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी एप्रिल महिन्यात शिर्डीत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पत्रकार अधिवेशन व पत्रकार कार्यशाळेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी संघटनेच्या मागील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पत्रकार सेवा संघाने केलेल्या उपक्रमांची माहिती मांडण्यात आली. पत्रकारांना येणाऱ्या अडचणी, पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, पत्रकारांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना, पत्रकार कल्याण निधी, अपघात विमा योजना, मानधन योजना, तसेच ग्रामीण व तालुका स्तरावरील पत्रकारांच्या समस्या यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
यावेळी पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामनाथ जऱ्हाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रत्येक घटनेचा आरसा पत्रकारितेमधून समाजासमोर येत असतो. मात्र अनेकदा पत्रकारांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या सर्व प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवणे गरजेचे आहे. पत्रकार सेवा संघ राज्यभरातील पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहे. आगामी राष्ट्रीय अधिवेशनातून पत्रकारांच्या प्रश्नांवर ठोस दिशा देणारे निर्णय घेतले जातील. असे त्यांनी सांगितले.

संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र बनकर यांनी सांगितले की, पत्रकार सेवा संघ ही केवळ संघटना नसून पत्रकारांसाठी एक मजबूत कुटुंब आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संघटन विस्ताराचे काम सुरू असून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. शिर्डीत होणारे राष्ट्रीय अधिवेशन राज्यातील तसेच देशभरातील पत्रकारांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
संघाचे सचिव अर्जुन आरगडे यांनी अधिवेशनाच्या तयारीबाबत माहिती देताना सांगितले की, राष्ट्रीय पत्रकार अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेमध्ये पत्रकारितेतील नवीन तंत्रज्ञान, डिजिटल पत्रकारिता, कायदेशीर बाबी, पत्रकार संरक्षण कायदे, तसेच पत्रकारांच्या हक्कांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. राज्यातील तसेच देशातील अनेक मान्यवर पत्रकार, संपादक व तज्ज्ञ या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस गणेश खेमनर यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार सेवा संघाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्न करत आहे. शिर्डीत होणारे राष्ट्रीय अधिवेशन हे पत्रकार एकजुटीचे प्रतीक ठरेल.
यावेळी राज्यसंघटक विकास भडकवाड यांनीही आपले मत व्यक्त करताना सांगितले की, पत्रकारांच्या सामाजिक व व्यावसायिक प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठवणे काळाची गरज आहे. पत्रकार सेवा संघ राज्यभरातील पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
या बैठकीस अस्फाक पिंजारी, आण्णा घुले, गुलाब वाघ, अनिल मोरे, अशोक बोखोटे, मारुती चौधरी, अंबादास सरोदे, कैय्युम शेख, रफीक शेख, आरीफ शहा यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय पत्रकार अधिवेशन यशस्वी करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, पत्रकार सेवा संघाचे राज्य खजिनदार सचिन उपाध्ये यांनी आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत बैठकीस शुभेच्छा देत राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीबाबत आपले मत व सूचना व्यक्त केल्याची माहिती देण्यात आली. बैठकीच्या शेवटी शिर्डीत होणारे राष्ट्रीय पत्रकार अधिवेशन राज्यातील तसेच देशभरातील पत्रकारांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
