“गॅस दरवाढीवरून संगमनेरात संतापाचा स्फोट!” – बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे तीव्र आंदोलन!

दिनांक. 13/03/2026 शुक्रवार

गॅस टंचाई आणि दरवाढ कमी करण्याची मागणी; सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे आवाहन – डॉ. जयश्रीताई थोरात

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

देशात वाढत असलेल्या गॅस दरवाढी आणि टंचाईच्या मुद्द्यावर संगमनेरमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत केंद्र सरकारकडे गॅस दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनात युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, प्रमिला अभंग, पद्माताई थोरात, राजू खरात, शिवाजी जगताप, बाबासाहेब गायकर, विलास वरपे, भास्कर शर्माळे, योगिता सातपुते, तात्याराम कुटे, शिवाजी खुळे, प्रवीण गायकवाड, नानासाहेब शिंदे, विजय पवार, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर सोसे, विद्यार्थी काँग्रेस राज्य सरचिटणीस हरीओम पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सध्या देशात महागाई वाढत असून गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. काही ठिकाणी गॅस उपलब्धतेची अडचणही निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की, गॅस दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य कुटुंबांवर होत आहे. अनेक ठिकाणी गॅस मिळण्यासाठी रांगा लागल्या असून महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने तातडीने गॅस दरवाढ कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय फटांगरे यांनीही केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत गॅस दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा देशभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आपले निवेदन अरुण उंडे यांच्याकडे सुपूर्द केले. प्रांताधिकारी उंडे यांनी हे निवेदन संबंधित शासनस्तरावर पाठवून आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!