
नेवासा (प्रतिनिधी) : नेवासा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या नेवासा शहरातील नव्याने सुरु झालेल्या जनसंपर्क कार्यालयाला आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार लंघे यांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागत व सत्कार स्वीकारून त्यांनी कार्यालयीन कामकाजाची माहिती जाणून घेतली.

जनसंपर्क कार्यालय हे शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, जनतेच्या समस्या, तक्रारी व प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी नमूद केले. तसेच, लोकप्रतिनिधी आणि जनतेतील नाळ अधिक मजबूत करण्यासाठी अशा कार्यालयांचे कार्य उपयुक्त ठरते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी नव्या कार्यालयाच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासनही दिले.

या भेटीदरम्यान परिसरातील अनेक नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेवासा परिसरात जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी उभारण्यात आलेले हे जनसंपर्क कार्यालय एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे, असे गौरवोद्गारही या प्रसंगी काढण्यात आले.
