शिबलापूर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील शिबलापूर गावातील वाळू डेपोविरोधात मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्याग्रही आमरण उपोषणाने आता गंभीर वळण घेतले आहे. उपोषणकर्त्यांपैकी एका व्यक्तीच्या साखरेचे प्रमाण घसरून प्रकृती चिंताजनक झाली असून, ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी दोन अॅम्बुलन्स, पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले असून, उपोषण सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील ‘आवादा ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या उपोषणात सहभागी असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही घटनांनी राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

प्रशासन अलर्ट – शिबलापूर उपोषण स्थळी अॅम्बुलन्स , पोलीस व महसूल अधिकारी दाखल
गेल्या काही तासांपासून उपोषणकर्त्याची तब्येत ढासळत असल्याचे लक्षात आल्यानंतर, तातडीने वैद्यकीय पथकासह दोन अॅम्बुलन्स घटनास्थळी पाठवण्यात आल्या. पोलीस निरीक्षक, तहसीलदार व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. प्रशासनाकडून उपोषण मागे घेण्याचे विनंती करण्यात आली असली तरी, ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत सांगितले – “मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही माघार घेणार नाही.”

गावकऱ्यांचा निर्धार कायम – लोकशक्तीची एकजूट
शिबलापूरमधील या आंदोलनास संपूर्ण गाव, विशेषतः महिला, युवक आणि विविध सामाजिक संघटनांचा प्रचंड पाठिंबा लाभत आहे. आंदोलकांमध्ये संताप असून, हा लढा केवळ वाळू डेपो विरोधात नसून, गावाच्या पर्यावरण आणि न्याय्य हक्कांसाठी असल्याचे स्पष्टपणे अधोरेखित केले जात आहे.

खासदार निलेश लंके यांचा थेट संवाद – “तुमच्या पाठीशी संपूर्ण जनता”
खासदार निलेश लंके यांनी उपोषणकर्त्यांशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांनी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला.> “ही लढाई केवळ एका वाळू डेपोविरोधात नाही, तर ही जनतेच्या न्याय्य हक्कांची लढाई आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असे भावनिक आवाहन त्यांनी केलं. तसेच त्यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले आणि त्यांना असेच खंबीरपणे पाठीशी राहण्याचे आवाहन केले.

उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या –
1. बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या वाळू डेपोवर तत्काळ बंदी घालावी.
2. संबंधित वाळू माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
3. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी तातडीने स्थलनिरीक्षण करून अहवाल प्रसिद्ध करावा.
केजमध्ये महिला उपोषणकर्तीचा मृत्यू –प्रशासनावर संताप
दुसरीकडे, केज तालुक्यातील ‘आवादा ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या शांततामय उपोषणात सहभागी असलेल्या एका महिलेला उष्माघाताने जीव गमवावा लागला. उपोषणाच्या सहाव्या दिवशी तिची प्रकृती खालावली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकशाहीला धक्का – आवाज दाबला जातोय का?शिबलापूरमध्ये उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडते, केजमध्ये उपोषणकर्तीचा मृत्यू होतो – आणि तरीही प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत असल्याची भावना लोकांमध्ये आहे.
“ही लढाई केवळ वाळू, पर्यावरण किंवा एखाद्या प्रकल्पाची नाही – ही लोकशाहीच्या अस्तित्वासाठी सुरू असलेली जिवंत चळवळ आहे.”
