विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा; धामोरी शाळा परिसरात कर्कश आवाजांवर बंदीची मागणी
धामोरी (प्रतिनिधी) – दत्तात्रय घुले
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात सतत होणाऱ्या कर्कश आवाजांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत असून, परिसरातील पालक, माजी विद्यार्थी व स्थानिक समाजसेवकांनी या प्रकारास विरोध दर्शवून संबंधित व्यावसायिकांवर कारवाईची मागणी केली आहे.
शाळेच्या अवतीभवती असलेल्या काही इलेक्ट्रिक व्यवसायिक दुकानदारांकडून व मोटारसायकल रिपेअरिंग करणाऱ्या केंद्रांवरून सतत हॉर्नच्या दणक्यांचा व अन्य कर्कश आवाजांचा त्रास होत आहे. यामुळे वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते असून, शिक्षणावर परिणाम होतो आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाकडे व शिक्षण विभागाकडे तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे.या पार्श्वभूमीवर न्यू इंग्लिश स्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षण विभागाने अशा व्यवसायिकांना समज देत निवेदन व नोटीस पाठवावी, अशी मागणी होत आहे.
तसेच शालेय व्यवस्थापन समिती व स्कूल कमिटीनेही या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कडक कारवाई करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.शाळा हा विद्यार्थ्यांचा घडण्याचा गाभा आहे. अशा ठिकाणी शांतता आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात अशा त्रासदायक प्रकारांना आळा बसावा व विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी योग्य वातावरण मिळावे, हीच अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होत आहे.
