114 धोरणात्मक प्रश्नांची मांडणी, 100% उपस्थिती, विविध विषयांवर प्रभावी पाठपुरावा
संगमनेर (प्रतिनिधी) – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी पावसाळी अधिवेशनात विधायक कार्याचा ठसा उमटवत शेतकरी, शिक्षक, वकील, बेरोजगार, डॉक्टर, इंजिनिअर यांच्यासह समाजाच्या सर्व घटकांच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवला. विधान परिषदेतील त्यांच्या 100% उपस्थितीसह एकूण 114 धोरणात्मक प्रश्न, 52 तारांकित प्रश्न, 11 लक्षवेधी सूचना, 4 अर्धा तास चर्चा, 5 अशासकीय ठराव, 14 औचित्य मुद्दे, 4 विशेष सूचना आणि 12 माहिती मुद्द्यांद्वारे सरकारचे लक्ष वेधण्यात त्यांनी यश मिळवले.
आ. तांबे यांनी विद्यार्थीदशेपासून एनएसयुआय चळवळीत कार्यरत राहून, जिल्हा परिषदेचे 10 वर्ष सदस्यत्व भूषवले आहे. त्यांनी सांगितले की, “मी नेहमी कामालाच प्राधान्य दिले असून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे. पावसाळी अधिवेशनात मांडलेल्या अनेक मुद्द्यांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून त्याचा पुढील पाठपुरावा करणार आहे.
”महत्त्वाचे प्रश्न व मुद्दे: शेततळ्यांना कंपाउंडसाठी अनुदान, शेतकऱ्यांच्या अडचणी, बेरोजगारी, बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई, कॅशलेस मेडिकल सुविधा, छत्रपती शिवाजी महाराजांचा सीबीएससी अभ्यासक्रमात समावेश, नाशिक-पुणे रेल्वे व ट्रॅफिक समस्या, शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न, कांदा प्रश्न व इतर शेतीविषयक विषय – या सर्व मुद्द्यांवर त्यांनी आवाज उठवला.
विधिमंडळात ठळक मांडणी:
52 तारांकित प्रश्नांपैकी 40 प्रश्न मंजूर, 11 लक्षवेधी सूचना, 5 अशासकीय ठराव, 4 अर्धातास चर्चा, 93 अन्वये 4 विशेष सूचना, 12 पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन.
शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य आणि नियोजनबद्ध विकास यासाठी आ. तांबे यांनी विधिमंडळात मुद्देसूद मांडणी केली. त्यांनी सांगितले की, “जनतेने दिलेल्या संधीचे सोनं करण्याचा मी प्रयत्न करत असून हे सर्व काम बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शक्य झाले.
”विशेष लक्षवेधी मुद्दे: नाशिक – पुणे रेल्वेचे वेगाने काम सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा
संगमनेर शहरातील ट्रॅफिक समस्यांवर उपाययोजना
महाराजांच्या इतिहासाचा सीबीएससी अभ्यासक्रमात समावेश
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, बाजारभाव आणि विमा योजनांबाबत चर्चा
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार व्यवस्था
“विधिमंडळ हे केवळ चर्चा मंच नसून, धोरणे आणि कायदे तयार करण्याचे ठिकाण आहे. त्या माध्यमातून मी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आवाज उठवत राहणार आहे,” असेही तांबे यांनी स्पष्ट केले.
