कोपरगाव : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क दत्तात्रय घुले
कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे श्रीसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराजांचा 111 वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने सुरू झाला आहे. हा सोहळा ललिता पंचमी निमित्त आठवडाभर सुरू राहणार असून, विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य जन्मोत्सव सोहळा शनिवार, दि. 27 सप्टेंबर रोजी जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे.
भक्तिभावाने ओथंबलेला सोहळाजय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी होणाऱ्या या जन्मोत्सव सोहळ्याची तयारी यंदाही मोठ्या उत्साहाने करण्यात आली आहे. सोहळ्याचा प्रारंभ श्री बाबाजी व जगद्गुरुंच्या पालखी मिरवणुकीने झाला. वाजतगाजत ढोल-ताशांच्या निनादात आणि जयघोषांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. संपूर्ण दहेगाव बोलका गाव भक्तीमय वातावरणात रंगून गेले होते.
आठवडाभराचे धार्मिक उपक्रमसोहळ्यादरम्यान भव्य जपानुष्ठान, हस्तलिखित नामजप, अखंड नंदादीप आणि रुद्र स्वहाकार यज्ञ सुरू आहेत. दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्यनियम विधी, ध्यान, प्राणायाम, सत्संग, प्रवचन, भजन व श्रमदान यांसारख्या धार्मिक उपक्रमांनी परिसर पवित्र भक्तिभावाने ओथंबून जात आहे.

संतांचा उपस्थितीत सोहळाया सोहळ्यास भक्त परिवारातील ज्येष्ठ संत परमेश्वर गिरी महाराज, प्रवक्ते विवेकानंद महाराज, रामानंद महाराज, श्री पदानंद महाराज, हृदयानंद माऊली यांच्यासह अनेक आश्रमीय संत उपस्थित होते. तसेच श्रावणजी तळेकर व दहेगाव बोलका व परिसरातील असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवत आहेत.भक्तिभाव, अध्यात्मिक ऊर्जा आणि उत्साह यांचा संगम ठरलेला हा जन्मोत्सव सोहळा पुढील काही दिवस दहेगाव बोलका व परिसरातील भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.
