आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंतीचे राजकारण करू नका – रामोशी समाजाचे ज्येष्ठ नेते देवराम गुळवे यांची खरमरीत टीका

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांच्या जयंतीवरून काही संधीसाधू मंडळी स्वार्थासाठी राजकारण करत आहेत, अशी खरमरीत टीका रामोशी समाजाचे ज्येष्ठ नेते देवराम गुळवे यांनी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कधीही जातीयवादी राजकारण केले नाही, तर सर्व समाजाला बरोबर घेऊन तालुक्याची प्रगती साधली आहे.

देवराम गुळवे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून रामोशी समाज प्रामाणिक व निष्ठावंत राहिला आहे. संगमनेरमध्ये यशोधन कार्यालयामार्फत उमाजी राजे नाईक यांची जयंती दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. तसेच, त्यांच्या सन्मानासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा केला जातो. तरीदेखील काहींना आतापर्यंत उमाजी राजे नाईक माहिती नसताना, ते आज स्वार्थासाठी विष कालवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

गुळवे म्हणाले की, रामोशी समाज कष्टाळू व प्रामाणिक आहे, नेतृत्वाच्या पाठीशी नेहमी भक्कमपणे उभा राहिला आहे. मात्र, जातीच्या नावावर आमच्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर “तुम्हाला फिरणे बंद करू” असा कडक इशाराही त्यांनी दिला.

तालुका संघटनेचे पैलवान तानाजी शिरतार यांनीही या प्रसंगी भाष्य करताना सांगितले की, बाळासाहेब थोरात यांनी उमाजी राजे नाईक यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केले आहे. जातीपातीवर कधीही राजकारण न करता रामोशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योजनांची अंमलबजावणी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, “आज काही मंडळी केवळ भगवी टोपी घालून फिरत आहेत. मात्र हिंदुत्व हे केवळ वेशभूषेत नसून विचारांत असले पाहिजे. संगमनेरमधील हिंदू वारकरी संप्रदायाचे अनुयायी असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत. जातीयवाद करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे.”या बैठकीस रमेश गफले, महेश गोफणे, रोशन गोफणे, सचिन गुळवे, संजय चव्हाण, मनोज चव्हाण, सचिन बोराडे, नितीन बोराडे, सोमा माकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!