“लंपीने शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त; दाढ खुर्दातील जनावरांचे मृत्यू वाढले, शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी”

संगमनेर तालुका व तालुक्यातील आश्वी पंचक्रोशी तसेच दाढ खुर्द गावात लंपी आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस गंभीर होत असून, जनावरांचे मृत्यूदर चिंताजनक पातळीवर पोहोचले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून गावातील अनेक गाई, कालवड्या मृत पावत असल्याने दुग्ध व्यवसायावर संपूर्णपणे जगणारा शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होऊ लागला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून शंभर टक्के लसीकरण न झाल्याचा आरोप शेतकरीवर्गातून होत असून, लंपीचा फैलाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

येथील शेतकरी सांगतात की, आज दुग्ध व्यवसाय म्हणजे त्यांच्या घराचा मुख्य आधार आहे. परंतु एका बाजूला दुधाला योग्य असा भाव मिळत नाही, तर दुसरीकडे जनावरे कवडीमोल किमतीत विकावी लागतात. त्यातच लंपीसारख्या प्राणघातक आजारामुळे जनावरे मृत पावल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. “जनावरं मेल्यानंतर आमच्याकडे काहीच उरत नाही. शेतीतून फारसे मिळत नाही, आणि गाई-वासरू म्हणजे आमची आर्थिक कणा असतो. तोच मोडायला लागल्याने आमचे जगणे कठीण झाले आहे,” अशी हळहळ शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

गावातील शेतकरी किशोर दादू वाघमारे यांची कालवड लंपीमुळे दगावली असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशाच घटना गावात रोजच्या प्रमाणात वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. जनावरांच्या उपचारासाठी औषधे, इंजेक्शन्स, फवारण्या या गोष्टींवर हजारो रुपये खर्च होत असतानाही जनावरे वाचत नसल्याने शेतकऱ्यांना मानसिक तणावाचा मोठा सामना करावा लागत आहे.

शेतकरीवर्गाची ठाम मागणी आहे की पिक विम्याप्रमाणेच जनावरांचादेखील विमा अनिवार्यपणे उतरवला पाहिजे. गाई, म्हशी, बैल, शेळ्या व बकऱ्यांचा शासन दरबारी सर्वे करून विमा लागू केल्यास जनावर मृत झाल्यानंतर शेतकऱ्याला काहीसा दिलासा मिळू शकेल आणि त्यातून दुसरे जनावर खरेदी करून व्यवसाय पुन्हा उभा करण्यास मदत होईल. “आज जनावराचा विमा नसल्यामुळे गाई मेल्यानंतर आम्ही अक्षरशः कोलमडलो जातो. विमा मिळाला तर संसार पुन्हा उभा राहू शकतो,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दाढ खुर्द व परिसरात वाढत चाललेल्या लंपीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक विश्व डळमळीत झाले आहे. त्यामुळे शासनाने व्यापक लसीकरण मोहीम राबवून, पशुवैद्यकीय पथके वाढवून आणि बाधित भागांमध्ये तातडीचे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!