आश्वी खुर्द : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. उसतोडणीचा हंगाम सुरू असल्याने शेतात माणसांची वर्दळ वाढली असून त्याच काळात बिबट्यांनी मानवी वस्तीकडे वारंवार येण्यास सुरुवात केली आहे. प्रवरानदीलगतच्या भागात बिबट्या आणि त्याच्या पिल्लांच्या हालचालीत अचानक वाढ झाली असून संध्याकाळच्या वेळेत हे सर्वाधिक प्रकर्षाने जाणवत आहे. वारंवार रस्त्यावर दिसणाऱ्या हालचालींमुळे लहान मुले, महिलावर्ग, वृद्ध आणि कामानिमित्त फिरणाऱ्या पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर आश्वी खुर्द येथील कै. कुंडलिक धोंडीबा पा. गायकवाड सेवाभावी संस्थेने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत तातडीचा पुढाकार घेतला. संस्थेने गावातील महत्त्वाच्या रस्त्यांजवळ आणि वस्तीच्या जवळपास ‘बिबट्या सावधान’ असे लक्षवेधी फलक लावून नागरिकांना सतर्कतेचा संदेश दिला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना परिस्थितीची जाणीव होऊन स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता राखण्यास मदत होत आहे. ग्रामस्थांना वेळेवर मिळालेली ही सूचना अत्यंत महत्त्वाची ठरली असून संस्थेच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बिबट्याच्या वाढत्या वावराची गंभीर दखल घेऊन वनविभागानेदेखील विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. अधिकारी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सावधगिरीच्या सूचना देत आहेत. शाळेच्या वेळेत बदल करण्याची सूचना, पशुधन सुरक्षित बांधून ठेवण्याची खबरदारी आणि रात्री अनावश्यक हालचाल टाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. जंगलक्षेत्राच्या ऱ्हासामुळे आणि उसाच्या शेतातील घनदाट वावरामुळे बिबट्या मानवी वस्तीकडे आकर्षित होत असल्याचेही वनविभागाचे निरीक्षण आहे.
संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असले तरी नागरिकांनी एकजूट दाखवत संस्थेच्या वेळेवर केलेल्या जनजागृती उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे. “समाजासाठी समाजाने पुढे यावे”, असा उदगार अनेकांनी व्यक्त केला असून हा उपक्रम इतर समाज संस्थांसाठी देखील प्रेरणादायी ठरल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
