“२२ वर्षांची सचिनप्रेमाची साधना! घुलेवाडीच्या सुधीर दरेकर यांनी उभारला २५ पुस्तकांचा ऐतिहासिक संग्रह”

घुलेवाडी (ता. संगमनेर) : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या चाहत्यांची संख्या लाखो-कोटींमध्ये असली, तरी त्यांच्याबद्दलची निष्ठा, प्रेम आणि वेड अंगी बाणवणारे काही निवडक चाहते आजही आपल्या मनातून इतिहास घडवत आहेत. त्यातच सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सुधीर रामनाथ दरेकर, घुलेवाडी (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील तेंडुलकरांचे अगदी हृदयापासून प्रेम करणारे चाहते.

दरेकर यांनी जवळपास २२ वर्षांचा कालावधी फक्त एकाच ध्यासावर खर्च केला – “सचिन तेंडुलकर यांच्या प्रत्येक बातमीची, प्रत्येक छायाचित्राची आणि प्रत्येक कामगिरीची जपणूक!” सन १९९९ पासून २०२२ पर्यंत विविध दैनिकांमध्ये प्रकाशित झालेली तेंडुलकर यांची सर्व छायाचित्रे, मुलाखती, लेख, रिपोर्ट, कात्रणे त्यांनी नियमितपणे गोळा करून ठेवली.

या धावत्या युगात लोक काही दिवसांतच आठवणी विसरतात, पण दरेकर यांनी तब्बल २२ वर्षे एकही दिवस न चुकता छायाचित्रे आणि बातम्यांचे कात्रण गोळा करण्याची प्रेरणादायी साधना जपली.

त्यांच्या या सातत्यपूर्ण कष्टातून आज २५ भव्य पुस्तकांचे अमूल्य संग्रहालय उभे राहिले आहे. प्रत्येक पुस्तकात १०० पूर्ण पानं आहेत, ज्यामध्ये तेंडुलकर यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सुवर्णक्षणांचे कात्रण, रेकॉर्डब्रेक इनिंग्ज, जगभरातील प्रतिक्रिया, पुरस्कार, प्रसिद्ध लेख, ऐतिहासिक छायाचित्रे इत्यादींचा समावेश आहे.

दरेकर यांचा हा संग्रह फक्त छंद नाही, तर एक काळाचा इतिहास ज्या काळात सचिन तेंडुलकर जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवत होते, त्या प्रत्येक क्षणाची ही कागदोपत्री जपणूक आज राष्ट्रासाठीही मौल्यवान ठरेल अशी जाणकारांची प्रतिक्रिया आहे.

या उपक्रमामागील त्यांची एकच मनोकामना –
“एकदा तरी स्वतः सचिन तेंडुलकर यांना भेटून हा संपूर्ण संग्रह त्यांच्या हाती दाखवावा!” या स्वप्नासाठी ते आजही सातत्याने प्रयत्नशील आहेत. अनेक वेळा मुंबई, पुणे तसेच विविध कार्यक्रमांमध्ये तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असला तरी योग्य संधी अद्याप मिळालेली नाही.

मात्र त्यांचे म्हणणे एकच –
“ज्या व्यक्तीने आयुष्यभर लाखो लोकांना प्रेरणा दिली, त्यांच्यासाठी माझी ही २५ पुस्तके माझे आयुष्यभराचे प्रेम आहे.”

सुधीर दरेकर यांचे हे कष्ट, निष्ठा आणि चिकाटी आज संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहेत. स्थानिक पातळीवरून राज्यभरातील क्रीडाप्रेमी देखील त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कार्याची दखल घेत आहेत.

दरेकर यांची ही सचिनभक्ती फक्त संग्रहापुरती मर्यादित नसून नव्या पिढीला एक संदेश देणारी आहे—“खरा चाहता तोच, जो आपल्या आदर्शाच्या प्रत्येक क्षणाची मनापासून जपणूक करतो!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!