“दुःखातही माणुसकी जपणारा निर्णय!” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय

“अजितदादा पवार यांच्या निधनाच्या शोकात महाराष्ट्र; ९ फेब्रुवारीला कोणतेही कार्यक्रम, होर्डिंग, सत्कार नको” – शिंदेंचे भावनिक आवाहन

मुंबई : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला आगामी वाढदिवस साजरा न करण्याचा संवेदनशील आणि माणुसकी जपणारा निर्णय घेतला आहे.

९ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही समारंभ, कार्यक्रम, सत्कार, पुष्पगुच्छ, होर्डिंग्ज किंवा जाहिराती लावू नयेत, असे स्पष्ट आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले आहे.

अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राने एक अनुभवी, लोकाभिमुख नेतृत्व गमावले असून, या वेदनेतून राज्य अजूनही सावरलेले नाही. “मी माझा जिवलग सहकारी आणि मित्र गमावला आहे. या दुःखाची तीव्रता शब्दांत मांडता येणार नाही. पवार कुटुंबाच्या दु:खात आपण सर्वजण सहभागी आहोत,” अशी भावनिक प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली.

या शोकाकुल वातावरणात कोणताही उत्सव, जल्लोष अथवा सोहळा साजरा करणे उचित ठरणार नाही, असे मत व्यक्त करत परिस्थितीचे गांभीर्य जपण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. समाजाने संयम राखावा, अनावश्यक खर्च टाळावा आणि दुःखाच्या या क्षणी संवेदनशीलतेने वागावे, असा संदेश त्यांनी दिला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, राजकीय मर्यादेपलीकडे जाऊन त्यांनी दाखवलेली माणुसकी आणि संवेदनशीलता राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!