“आश्वीत आता खरंच ‘कायद्याचे राज्य’ येणार का?” – नवे प्रभारी सुदाम शिरसाठ यांच्यासमोर अवैध धंदे व गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान!
आश्वी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
राजकीय, सामाजिक आणि व्यापारीदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या आश्वी पोलीस ठाण्याची धुरा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी स्वीकारल्याने परिसरात नव्या अपेक्षांचा सूर उमटू लागला आहे. मात्र, पदभार स्वीकारताच त्यांच्या समोर अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी आणि कायद्याचा ढासळलेला धाक पुन्हा प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आश्वी आणि परिसरात कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. अवैध व्यवसाय, मोकाट गुन्हेगारी प्रवृत्ती, रस्त्यावर होणारी भाईगिरी, हाणामारी आणि टोळीयुद्धाच्या घटना यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा उघडपणे होत आहे. “आश्वीत कायद्याचा धाक कमी झाला आहे,” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
पोलीस ठाण्यातील या बदलानंतर संपूर्ण परिसरात एकच चर्चा सुरू आहे – “सुदाम शिरसाठ हे आश्वीत खाकीचा दरारा पुन्हा निर्माण करू शकणार का?”चौकाचौकात, चहाच्या टपऱ्यांवर आणि गावपातळीवर या विषयावर चर्चा रंगताना दिसत असून, “आता तरी परिस्थिती बदलेल का?” असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.
राहुरी पोलीस ठाण्यातील शिरसाठ यांचा कार्यकाळ शिस्तबद्ध आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रभावी ठरल्याची चर्चा आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण, अवैध धंद्यांवर कारवाई आणि नागरिकांशी संवाद याबाबत त्यांची ओळख निर्माण झाली होती. मात्र, आश्वी हे ‘मैदान’ वेगळे असून, येथे राजकीय हस्तक्षेप, स्थानिक दबावगट आणि सामाजिक समीकरणे अधिक गुंतागुंतीची असल्याने शिरसाठ यांची खरी कसोटी येथे लागणार आहे.
नव्या अधिकाऱ्याकडून नागरिकांना केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष कृती अपेक्षित आहे.– गावोगाव सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद व्हावेत.– रस्त्यावर आणि चौकात होणारी भाईगिरी थांबवावी.– हाणामारी, टोळीयुद्ध आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई व्हावी.– सामान्य नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी.“कायद्याचा धाक निर्माण झाला तरच आश्वी सुरक्षित बनेल,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शिरसाठ हे पदभार स्वीकारताच ‘ॲक्शन मोड’मध्ये येणार की केवळ प्रशासकीय कामकाजापुरते मर्यादित राहणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पहिल्या काही दिवसांतच त्यांनी ठोस पावले उचलली, तरच आश्वीत कायद्याचे राज्य प्रस्थापित होईल, अन्यथा परिस्थिती ‘जैसे थे’ राहण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
आश्वीकरांना आता केवळ बदलाची नव्हे, तर कडक, निष्पक्ष आणि निर्भीड कारवाईची अपेक्षा आहे. नवे प्रभारी सुदाम शिरसाठ हे या अपेक्षांवर कितपत खरे उतरतात, यावरच आश्वीतील पुढील कायदा-सुव्यवस्थेचे भवितव्य ठरणार आहे.
