सुपा एमआयडीसीत उद्योजकांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औद्योगिक विकासासाठी सुरक्षित, भयमुक्त व पोषक वातावरण निर्माण करण्यास शासन कटिबद्ध; ‘तौरल इंडिया’ प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी स्पष्ट इशारा

सुपा, पारनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना धमकावणे, दबाव टाकणे अथवा औद्योगिक विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृती खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. सुपा एमआयडीसीमध्ये ‘तौरल इंडिया’ या कंपनीच्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, औद्योगिक वसाहतींमध्ये शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचे वातावरण राखणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. स्थानिक पातळीवर उद्योगांना त्रास देणाऱ्या किंवा औद्योगिक विकासात अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. उद्योगांना भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असून, यासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे.

ते पुढे म्हणाले की, उद्योगांच्या कामकाजात काही त्रुटी आढळल्यास त्यावर कार्यवाही करण्यासाठी शासनाकडे सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही खासगी व्यक्तीने किंवा गटाने कायदा हातात घेणे योग्य ठरणार नाही. अशा प्रकारे धमकी, दबाव किंवा अडथळे निर्माण केल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शासन विविध धोरणात्मक निर्णय घेत असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्योगांसाठी ‘कॉस्ट ऑफ डुइंग बिझनेस’ कमी करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. पुढील पाच वर्षांत औद्योगिक विजेचे दर स्थिर ठेवण्याचे नियोजन असून, वाहतूक व लॉजिस्टिक्स खर्च कमी कसा करता येईल, यासाठी सुस्पष्ट धोरण आखण्यात येत आहे.

महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात देशात अग्रस्थानी ठेवणे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करणे हे शासनाचे ध्येय आहे. यासाठी उद्योजकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

यावेळी मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी, औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘तौरल इंडिया’चा हा अत्याधुनिक प्रकल्प परिसराच्या औद्योगिक प्रगतीस चालना देणारा ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!