माझी वसुंधरा ५.० मध्ये अहिल्यानगरची पुन्हा बाजी – नाशिक विभागात अव्वल

३ ग्रामपंचायतींना दीड कोटींची बक्षीस सलग पाचव्यांदा जिल्हा परिषदेचा दबदबा | पर्यावरण संवर्धनात अहिल्यानगर ठरला राज्यासाठी आदर्श मॉडेल

‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत अहिल्यानगर जिल्हा परिषदने नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विभागस्तरीय प्रथम पुरस्कार जाहीर झाला असून, जिल्ह्यातील तीन आदर्श ग्रामपंचायतींना एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचे घवघवीत पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.राज्य शासनाच्या वतीने १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात राज्यातील २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धात्मक अभियानात अहिल्यानगर जिल्ह्याने सलग पाचव्यांदा पुरस्कार पटकावून आपली गुणवत्ता आणि कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना नाशिक विभागस्तरावर प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.यामध्ये —• तीन ते पाच हजार लोकसंख्या गटात शेवगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रुक,• दीड ते अडीच हजार लोकसंख्या गटात अकोले तालुक्यातील लहित खुर्द,• दीड हजारांपेक्षा कमी लोकसंख्या गटात श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबादया ग्रामपंचायतींचा समावेश असून, प्रत्येकी ५० लाख रुपये असे एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचे बक्षीस त्यांना प्रदान करण्यात आले आहे.

याशिवाय, विभागस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती अहिल्यानगर व राहाता, तर जिल्हास्तरावर सर्वोत्तम गटविकास अधिकारी म्हणून पंचायत समिती संगमनेर यांना प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन नोडल अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या नियंत्रणाखाली ग्रामीण भागात प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आली. तसेच, २०२५–२६ मधील क्षेत्रीय पाहणी व मूल्यांकन विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने जिल्ह्याला ही मोठी उपलब्धी मिळाली आहे.

पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी मिळालेल्या बक्षीस रकमेपैकी ५० टक्के निधी हरित क्षेत्र वाढीसाठी व उर्वरित ५० टक्के निधी पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. या ग्रामपंचायतींनी भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांच्या संवर्धनासाठी विविध नाविन्यपूर्ण व प्रभावी उपाययोजना राबवल्या आहेत.भूमी घटकांतर्गत देशी प्रजातींच्या झाडांची लागवड, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती, रोपवाटिका निर्मिती व स्वच्छतेवर भर देण्यात आला.

जल घटकांतर्गत पर्जन्य जलसंधारण, जलस्त्रोतांची स्वच्छता, जल लेखापरीक्षण आणि कृत्रिम जलकुंडांची उभारणी करण्यात आली.वायू घटकांतर्गत हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण, फटाके बंदी, सायकल ट्रॅक व ई-वाहन चार्जिंग स्टेशनची निर्मिती करण्यात आली. अग्नी घटकांतर्गत सौर ऊर्जा, एलईडी पथदिवे, ऊर्जा लेखापरीक्षण आणि वीज बचतीस प्रोत्साहन देण्यात आले.आकाश घटकांतर्गत जनजागृती, पर्यावरण शपथ, शालेय उपक्रम व भित्तीचित्रांद्वारे व्यापक प्रचार करण्यात आला.आजपर्यंत ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींना एकूण २० कोटी ६५ लाख रुपयांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आगामी ‘माझी वसुंधरा ६.०’ (२०२५–२६) मध्येही हे यश कायम राखण्याचा निर्धार नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी व्यक्त केला आहे.

या यशात मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, नोडल अधिकारी राजेंद्र देसले, जिल्हा समन्वयक रविंद्र ठाणगे, सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, डाटा एंट्री ऑपरेटर आणि लोकप्रतिनिधी यांचे मोठे योगदान लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!