दिनांक. 19 फेब्रुवारी 2026
रक्तदान हेच श्रेष्ठ दान! समाजहितासाठी भाजप कार्यकर्त्यांचा प्रेरणादायी उपक्रम
कुर्ला : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पावन पर्वावर भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्र. १६९ आणि अर्जुना बहुउद्देशीय महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या संपन्न झाले. या उपक्रमास नागरिकांचा, युवकांचा व महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला. समाजहिताची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून रक्तदान केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामाजिक बांधिलकी, लोककल्याण आणि जनसेवेच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनामागे भाजप वॉर्ड क्र. १६९ चे अध्यक्ष श्री. संदीप दीपक काळे, अर्जुना बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. मानसी मुंगे, तसेच सर्व पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे मोठे योगदान लाभले. रक्तदान शिबिराचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. रक्तदात्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली सुरक्षित वातावरणात रक्तसंकलन प्रक्रिया पार पडली. रक्तदानानंतर रक्तदात्यांना आवश्यक आरोग्य सल्ला व अल्पोपहार देण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी “रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून, समाजातील गरजू रुग्णांसाठी ते जीवनदान ठरते” असे प्रतिपादन केले. अशा उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमानंतर अध्यक्ष संदीप दीपक काळे यांनी सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानत, “समाजहितासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. हा उपक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना खरी मानवंदना आहे,” असे सांगितले.

या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी आयोजकांचे कौतुक केले असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
