अहिल्यानगर मध्ये शिवरायांच्या शौर्यगाथेने दुमदुमले माऊली सभागृह!

दिनांक.20 फेब्रुवारी 2026 शुक्रवार

‘शाहिरी शिवगर्जना’ कार्यक्रमाला अहिल्यानगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; स्थानिक कलाकारांची सादरीकरणे ठरली आकर्षण

अहिल्यानगर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्यनिर्मितीचा ध्यास आणि लोककल्याणकारी कारभार यांचा जागर करणारा ‘शाहिरी शिवगर्जना’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सावेडी येथील माऊली सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. सांस्कृतिक कार्य विभाग (मुंबई) आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार नागेश गायकवाड, तहसीलदार स्वप्नील ढवळे, हिमालय घोरपडे, महानगरपालिकेचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

प्रसिद्ध शाहीर सुमित धुमाळ आणि त्यांच्या दहा सहकलावंतांच्या चमूने शिवरायांचे शौर्य, स्वराज्याची उभारणी, जनकल्याणकारी धोरणे आणि ऐतिहासिक पराक्रम यांचे प्रभावी सादरीकरण केले. शाहिरी पोवाडे, शिवगीते, पारंपरिक वाद्यांची साथ आणि ओजस्वी सादरीकरणामुळे सभागृहात संपूर्णतः शिवमय वातावरण निर्माण झाले. प्रत्येक सादरीकरणानंतर “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले.

शिवरायांच्या जन्मापासून स्वराज्यस्थापनेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास, लोकाभिमुख प्रशासन, शिस्तबद्ध लष्करी धोरण आणि न्यायप्रिय नेतृत्व या विविध पैलूंवर आधारित सादरीकरणांनी उपस्थितांच्या मनात राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना जागृत केली.

कार्यक्रमात अहिल्यानगर येथील स्थानिक कलाकारांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्यछटा, नृत्यप्रकार आणि शिवगीते सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. ओमकार देशमुख या चिमुकल्या कलाकाराने सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. तसेच ध्वज विराज मुनोत व काव्या भालेराव या बाल कलाकारांनी शिवरायांच्या दूरदृष्टीवर आधारित पोवाडा सादर करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

‘नृत्य झंकार’च्या कलाकारांनी शिवरायांच्या शौर्यावर आधारित सादर केलेल्या नृत्याने तसेच ‘व्हिक्टर डान्स अकादमी’च्या कलाकारांनी शिवजन्मोत्सव व प्रतापगडाच्या रणसंग्रामावर आधारित सादर केलेल्या नृत्यनाट्याने कार्यक्रमाला विशेष उंची मिळवून दिली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे उत्स्फूर्त कौतुक केले.

या कार्यक्रमामुळे युवक-युवतींमध्ये शिवरायांचे विचार, स्वराज्याची मूल्ये, सामाजिक समरसता, धैर्य, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठा यांचे महत्त्व अधिक दृढ झाले. शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी चरित्र समाजातील प्रत्येक घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला.

‘शाहिरी शिवगर्जना’ या उपक्रमाने नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करत शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा अधिक बळकट केली आणि कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!