दिनांक.20 फेब्रुवारी 2026 शुक्रवार
‘रायबा हेच का आपलं स्वराज्य’ महानाट्याने संगमनेर भारावला
संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
समाजातील अठरापगड जाती-धर्मातील जनतेला एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. सामाजिक न्याय, समता, महिलांचा सन्मान, लोकशाही मूल्ये व शेतकऱ्यांप्रती आदर हे महाराजांचे जीवनकार्य जगातील प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सादर करण्यात आलेल्या ‘रायबा हेच का आपलं स्वराज्य’ या महानाट्याने उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घालून अंतर्मुख केले. अनेक प्रसंगांमध्ये प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले.
जयहिंद लोकचळवळीच्या वतीने कवी अनंत फंदी फुले नाट्यगृहात सादर करण्यात आलेल्या या महानाट्याला हजारो नागरिक, युवक व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, लक्ष्मणराव कुटे, पांडुरंग पा. घुले यांच्यासह विविध पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा उद्देश हा केवळ सत्ता प्राप्ती नव्हता, तर रयतेच्या कल्याणासाठी न्यायाधिष्ठित व्यवस्था उभी करणे हा होता. स्वराज्यात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. जाती-धर्माच्या नावावर भांडणे व राजकारण होत नव्हते. मात्र आज वाढलेला भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार, व्यसनाधीनता, शेतकरी आत्महत्या, जातीवाद आणि समाजातील दरी यावर या महानाट्यात प्रभावी भाष्य करण्यात आले.
प्रा. प्रकाशकुमार वाघमारे यांच्या दिग्दर्शनाखाली संगमनेरचे सुपुत्र डॉ. सागर फापाळे व ४० कलाकारांनी साकारलेल्या या नाटकात आजची सामाजिक स्थिती पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटले असते, याचे प्रभावी चित्रण करण्यात आले. शेतकरी आत्महत्येचा प्रसंग, गड-किल्ल्यांवर होणारी जल्लोषबाजी, जाती-धर्मावर आधारित राजकारण, तरुणाईचे भरकटलेपण या विषयांनी प्रेक्षक अंतर्मुख झाले.
महाराजांनी जिरे टोप व भवानी तलवारीचा त्याग केलेला प्रसंग, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, रांझा गावचा पाटील, शिवा काशीचे बलिदान, तानाजी मालुसरे यांची झुंज या थरारक प्रसंगांनी नाटकाला ऐतिहासिक उंची दिली. भव्य-दिव्य स्टेज, विद्युत रोषणाई, हुबेहूब इतिहासकालीन मांडणी आणि जयघोषांनी संपूर्ण नाट्यगृह शिवमय झाले.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आराध्य दैवत असून त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू दिशादर्शक आहे. संकट काळात महाराजांचे जीवनचरित्र मार्ग दाखवणारे असून त्यांच्या विचारांचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले की, केवळ जयंती साजरी करण्यापुरते मर्यादित न राहता महाराजांचा विचार घराघरात पोहोचवण्याची गरज आहे. समाजातील आजची स्थिती सुधारण्यासाठी शिवविचारांचे पालन करणे आवश्यक असून युवकांनी या शिवकार्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या महानाट्याने इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घालून समाजाला आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त केले. संगमनेरमध्ये सादर झालेल्या या नाटकाने सामाजिक प्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून आपली वेगळी छाप उमटवली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सदैव प्रेरणादायी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन स्वराज्य उभारले. संकट काळात महाराजांचे जीवनचरित्र हे मार्गदर्शक ठरते. महाराजांचा विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा. महाराष्ट्रात शिवविचारांचे नवे स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
