माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये संगमनेरनगरपरिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार!

दिनांक.22 फेब्रुवारी 2026 रविवार

सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते संगमनेर नगरपरिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार — पर्यावरण संवर्धनातील भरीव कामगिरीला गौरव

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ अंतर्गत पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संगमनेर नगरपरिषदेला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील वरळीमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे झालेल्या भव्य समारंभात ५० हजार ते १ लाख लोकसंख्या गटातील अमृत शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा बहुमान प्रदान करण्यात आला.

या गौरव समारंभात मा. उपमुख्यमंत्री ना. सौ. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे तसेच नगरसेवक किशोर टोकसे आदी मान्यवर उपस्थित होते.

संगमनेर नगरपरिषदेने पर्यावरण संवर्धनासाठी भूमी, जल, वायु, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी विविध प्रभावी उपक्रम राबवले. स्वच्छता मोहिमा, घनकचरा व्यवस्थापन, जलसंधारण प्रकल्प, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, प्लास्टिक वापरावर नियंत्रण, प्रदूषण नियंत्रण उपाययोजना यामुळे शहराच्या पर्यावरणीय कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली.

लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे व तत्कालीन नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या पर्यावरणपूरक धोरणांना आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली अधिक गती मिळाली. सातत्यपूर्ण नियोजन, काटेकोर अंमलबजावणी आणि नागरिकांचा सहभाग यामुळे संगमनेरने राज्य पातळीवर आपला ठसा उमटवला आहे.

हा पुरस्कार नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि शहरातील जागरूक नागरिक यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी सांगितले. “हा सन्मान भविष्यात अधिक जोमाने पर्यावरण संरक्षणासाठी काम करण्याची प्रेरणा देणारा आहे,” असे त्यांनी नमूद केले.

या यशाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी संगमनेर नगरपरिषदेचे अभिनंदन केले.

पर्यावरण संरक्षण ही स्पर्धा नसून आपली सामूहिक जबाबदारी आहे. आज मिळालेला हा सन्मान सर्व संगमनेरकरांचा असून भविष्यात अधिक प्रभावी कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे.— डॉ. मैथिलीताई तांबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!