दिनांक.23 फेब्रुवारी 2026 सोमवार
थोरात कारखाना, दूध संघ व अमृतवाहिनी संस्थांना दिल्या भेटी; प्रत्यक्ष अनुभवातून घेतला विकासाचा धडा
संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
दुष्काळी तालुका ते वैभवशाली आणि प्रगतशील तालुका असा यशस्वी प्रवास करणाऱ्या संगमनेरच्या सहकार चळवळीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तब्बल ६,७०० शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तालुक्यातील विविध सहकारी व शैक्षणिक संस्थांना भेटी देत अभ्यास केला. संगमनेरची ओळख असलेल्या या ‘सहकार पंढरी’चे प्रत्यक्ष दर्शन घेत विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले. थोर स्वातंत्र्यसेनानी व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये सहकाराचा पाया भक्कम करत विकासाचा राजमार्ग खुला केला. त्यांच्या दूरदृष्टीतून उभारलेल्या थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी सहकारी बँक आणि अमृतवाहिनी शिक्षण संकुल या संस्थांनी संगमनेरच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासात मोलाची भूमिका बजावली आहे. या परंपरेला पुढे नेत बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार आज राज्य व देशासाठी दिशादर्शक ठरत आहे.

या उपक्रमाचे आयोजन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच सहकार, शेती, उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी सहकारी बँक, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, डेंटल कॉलेज तसेच इतर सहकारी संस्थांना भेटी देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी ऊस गाळप प्रक्रिया, साखर निर्मिती, अल्कोहोल उत्पादन, वीज निर्मिती तसेच दूध प्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती यांचा सखोल अभ्यास केला. तसेच अमृतवाहिनी समूहातील इंजिनिअरिंग, पॉलीटेक्निक, एमबीए, फार्मसी व डेंटल कॉलेजमधील अत्याधुनिक शिक्षण पद्धतींची माहिती घेतली.

अमृत उद्योग समूहाचा हिरवागार, स्वच्छ व शिस्तबद्ध परिसर, भव्य प्रशासकीय इमारत, अमृतेश्वर मंदिर, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे प्रेरणास्थळ, बांबूचे बन, दररोज हजारो नागरिकांची होणारी वर्दळ आणि प्रसन्न वातावरण यामुळे सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांनी बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, रणजितसिंह देशमुख तसेच विविध मान्यवरांशी संवाद साधत सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभव जाणून घेतला. श्रमिक महाविद्यालय, पानवडी, सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल, अमृतवाहिनी संकुलातील विविध शाळा तसेच संगमनेर शहरातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या अभ्यास दौऱ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून जीवनोपयोगी ज्ञान मिळाल्याने हा अभ्यास दौरा त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.

तालुक्याच्या विकासात सहकारी संस्थांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
दुष्काळी तालुका ते विकसित तालुका या परिवर्तनामध्ये सहकार चळवळीने मोलाची भूमिका बजावली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर संगमनेरची वाटचाल सुरू असून सहकारी संस्था, गुणवत्तेच्या शिक्षण संस्था, प्रगतशील शेती, पाईपलाईनचे जाळे आणि कष्टकरी शेतकरी यांच्या योगदानातून संगमनेर तालुका उभा राहिला आहे. बदलत्या काळात तरुण पिढीने नवीन तंत्रज्ञान, एआय यांचा अभ्यास करून आपल्या कुटुंबाचा, गावाचा व तालुक्याचा लौकिक वाढवावा, असे आवाहन माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

