दिनांक. 23 फेब्रुवारी 2026
श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त अहिल्यानगरात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन
अहिल्यानगर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त सामाजिक एकात्मता, सेवाभाव आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी येथील भाई दया सिंह जी गुरुद्वारा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्या हस्ते झाले. अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर, राष्ट्रीय आरोग्य अभियान तसेच भाई दया सिंह जी गुरुद्वारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी बलदेव सिंग वाही, अमरप्रीत वाही, अमनदीप वाही, अश्विंदर मल्होत्रा, ब्रह्मा लोंगियानी, मोंटू लोंगियानी, इकजस नारंग, गुरजस नारंग, हरप्रीत नारंग, कुलबीर सिंग वाही, रविंदर सिंग नारंग यांच्यासह गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते म्हणाले की, “श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांनी मानवतेसाठी आणि धर्मस्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर व जनजागृती उपक्रम समाजसेवेचे उत्तम उदाहरण आहे. निरोगी समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने आरोग्य तपासणी करावी आणि रक्तदानासारख्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.

या शिबिरात फिजिशियन, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ व दंततज्ज्ञ अशा विविध क्षेत्रातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, छातीचा एक्स-रे तसेच विविध प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या. याशिवाय आयुष्मान भारत कार्ड, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना कार्ड, आभा कार्ड आणि शिधापत्रिका योजनांबाबत माहिती व नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेतला.

रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” हा संदेश या माध्यमातून प्रभावीपणे देण्यात आला. हा उपक्रम समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणारा आणि सेवाभावाची प्रेरणा देणारा ठरला.
