आश्वी पोलीस ठाण्यात नव्या ठाणेदाराची एन्ट्री आणि थेट ॲक्शन!

दिनांक. २४ फेब्रुवारी २०२६ मंगळावर

अंधारात पहाटे 4 वाजता पोलिसांचा धडाका! वाळू माफियांवर धडक कारवाई — लाखोंचा मुद्देमाल जप्त

संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पोलिसांनी जोरदार धडक कारवाई करत वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे. पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी पिकअप वाहनासह सुमारे १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका संशयित चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुकतेच पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. २२ फेब्रुवारी २०२६) पहाटे सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास चिंचपूर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना संशयास्पद हालचाली आढळून आल्याने त्यांनी एका पिकअप वाहनास थांबवले. तपासणीदरम्यान वाहनामध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या भरलेली वाळू आढळून आली. तत्काळ पोलिसांनी वाहन जप्त करून पिकअप वाहन व वाळू असा एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या प्रकरणी वाहन चालक मयूर वेळे (वय २५) याच्याविरुद्ध तसेच एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २९/२०२६ नुसार, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र पारधी हे करीत आहेत.

दरम्यान, आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही परिस्थितीत अवैध वाळू उपसा व वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचा कडक इशारा पोलिसांनी दिला आहे. येत्या काळात अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र केल्या जाणार असून, कायद्याचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, सामान्य नागरिकांकडून पोलिसांच्या या ठोस भूमिकेचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!