“पोलीस ठाणे की भंगार गोदाम? आश्वी पोलीस ठाण्यातील धक्कादायक वास्तव उघड!”

दिनांक.24 फेब्रुवारी 2026

कायद्याचे रक्षक अडकले भंगाराच्या विळख्यात! आश्वी पोलीस ठाण्याची संतापजनक अवस्था!

आश्वी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

संगमनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी पोलीस ठाणे सध्या जप्त व अपघातग्रस्त वाहनांच्या साठ्यामुळे अक्षरशः वेढले गेले आहे. विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने पोलीस ठाण्याचा संपूर्ण परिसर भंगार साठ्यासारखा भासू लागला असून, याचा थेट परिणाम पोलिसांच्या दैनंदिन कामकाजावर तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांवर होताना दिसत आहे.

आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक, मद्यतस्करी, चोरी, वाहतूक अपघात, वाद-विवाद यांसारख्या विविध प्रकरणांमध्ये सातत्याने कारवाया केल्या जातात. या कारवायांदरम्यान दुचाकी, चारचाकी, पिकअप वाहने, ट्रॅक्टर तसेच अपघातग्रस्त गाड्या मोठ्या प्रमाणात जप्त केल्या जातात. मात्र, या वाहनांच्या विल्हेवाटीची प्रभावी व्यवस्था नसल्यामुळे वर्षानुवर्षे अनेक वाहने एकाच ठिकाणी उभी राहून धूळ खात गंजत चालली आहेत.

न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असणे, आरटीओ तपासणीची प्रतीक्षा आणि काही प्रकरणांत वाहन मालकांची उदासीनता यामुळे ही वाहने हलवणे शक्य होत नाही. परिणामी, पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनांचा मोठा साठा तयार झाला असून, मोकळी जागाच शिल्लक राहिलेली नाही. यामुळे तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने लावण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, आश्वी पोलीस ठाण्याची इमारत मुळातच मर्यादित क्षमतेची आहे. त्यातच जप्त वाहनांच्या साठ्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करताना मोठ्या अडचणी येत आहेत. कर्मचारी संख्या मंजूर पदसंख्येपेक्षा कमी असल्याने आधीच ताणाखाली असलेल्या पोलिसांवर जागेच्या अभावामुळे अतिरिक्त मानसिक व शारीरिक ताण निर्माण होत आहे.

या परिस्थितीचा फटका शेजारी असलेल्या तलाठी कार्यालयालाही बसत असून, परिसरात अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनांमुळे संपूर्ण शासकीय संकुलाचे विद्रुपीकरण होत आहे. आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिकांचा या परिसरात वावर असल्याने, पोलीस ठाण्याचा परिसर शासकीय कार्यालयाऐवजी भंगार साठा असल्याचा भास निर्माण होत आहे.

नागरिकांकडून जप्त व अपघातग्रस्त वाहनांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि बंदिस्त वाहन तळ उभारण्याची मागणी होत आहे. तसेच, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेल्या वाहनांचा तातडीने लिलाव करून परिसर मोकळा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने वेळीच ठोस निर्णय घेतला नाही, तर भविष्यात ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!