दिनांक. 25 फेब्रुवारी 2026 बुधवार
संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
उन्हाळ्यात वाढलेल्या वनव्यास रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन; पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येण्याची गरज

उन्हाळा सुरू होताच संगमनेर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध डोंगरांवर लागणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून, यामुळे मौल्यवान वनसंपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी डोंगरांना आग लावू नये, तसेच चुकून आग लागल्यास तात्काळ वन विभाग व ग्रामपंचायत कार्यालयास माहिती द्यावी, असे कळकळीचे आवाहन संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष तथा दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी असल्याचे सांगताना सौ. तांबे म्हणाल्या की, वृक्ष, वनराई आणि ऑक्सिजन हे मानवी जीवनासाठी अत्यावश्यक घटक आहेत. कोरोना काळात संपूर्ण जगाने ऑक्सिजनचे महत्त्व अनुभवले असून, तो कठीण काळ पुन्हा येऊ नये यासाठी आजपासूनच वृक्षारोपण आणि संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करणे आवश्यक आहे.
सध्या अनेक ठिकाणी निष्काळजीपणे शेकोटी पेटवणे, डोंगरांमध्ये कचरा जाळणे, तसेच मानवी दुर्लक्षामुळे वनव्यासारख्या घटना घडत आहेत. परिणामी, लहान झाडे जळून नष्ट होत आहेत, मोठी झाडे होरपळून जात आहेत, वन्यजीवांचे जीवन धोक्यात येत असून निसर्गचक्रात गंभीर बिघाड निर्माण होत आहे. हे चित्र अत्यंत दुर्दैवी व चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘दंडकारण्य अभियानाने’ संगमनेर तालुक्यात मोठी लोकचळवळ उभी केली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेत डोंगरांवर वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. आजही उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करून वृक्ष जगवण्याचे काम सातत्याने सुरू आहे.
मात्र, काही ठिकाणी लागणाऱ्या आगींमुळे हे प्रयत्न व्यर्थ ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वन विभागाने गस्त वाढवावी, संशयितांवर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांनीही सतर्क राहून हिरवाई जपण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सौ. दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.
“आपले डोंगर – आपले पर्यावरण – आपली जबाबदारी” या भावनेतून सर्व ग्रामस्थ व नागरिकांनी एकत्र येऊन वनसंपदा जपण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
