दिनांक. 25 फेब्रुवारी 2026 बुधवार
डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून 7 ते 12 मार्चदरम्यान क्रिकेट, बॅडमिंटन व रस्सीखेच स्पर्धांची मेजवानी
संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सबलीकरणासाठी आणि त्यांच्या क्रीडा कौशल्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने एकविरा फाउंडेशनच्या वतीने संगमनेर शहरात 7 मार्च ते 12 मार्च 2026 या कालावधीत भव्य महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आयोजन कॅन्सरतज्ञ व एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांपासून या स्पर्धांचे सातत्याने आयोजन केले जात असून, या उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या स्पर्धांमध्ये शालेय विद्यार्थिनींपासून ते 65 वर्षांपर्यंतच्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.
यावर्षी महिला टेनिस बॉल क्रिकेट, बॅडमिंटन आणि रस्सीखेच अशा तीन प्रमुख क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धा लहान गट (इयत्ता 1 ली ते 10 वी), मध्यम गट (11 वी ते पदवी) आणि खुला गट (महिला) अशा तीन गटांत होणार आहेत. क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 11,100 रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 7,000 रुपये व ट्रॉफी, तर तृतीय पारितोषिक 5,000 रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे. बॅडमिंटन स्पर्धेसाठी वैयक्तिक स्वरूपात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
स्पर्धांचे उद्घाटन 7 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि आयोजक डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या स्पर्धांद्वारे महिलांमध्ये आत्मविश्वास, संघभावना, आरोग्य जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत, हा मुख्य उद्देश असून अधिकाधिक महिला व युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी यशोधन कार्यालय किंवा 7057037037 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
