दिनांक. 25 फेब्रुवारी 2026 बुधवार
कमी मनुष्यबळातही आश्वी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; अपहरणाचा प्रयत्न फसवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
आश्वी : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलीला चारचाकी वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न आश्वी पोलिसांनी अत्यंत शिताफीने हाणून पाडत थरारक पाठलागानंतर आरोपीला ताब्यात घेऊन मुलीची सुखरूप सुटका केली. कमी मनुष्यबळ असूनही पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आश्वी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोमवारी सकाळी सुमारे ९.३० वाजता आश्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तींनी चारचाकी वाहनात बसवून पळवून नेत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश आहेर आणि सचिन सातपुते यांच्यासह तत्काळ पाठलाग सुरू केला.
दरम्यान, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनाही घटनेची माहिती देऊन सतर्क करण्यात आले. संगमनेर व आश्वी पोलीस दलाने संयुक्तपणे वडगावपान शिवारात मोठ्या शिताफीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि पीडित मुलीची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणी आरोपी सतीश शेळके (वय २७, रा. पोटा, जि. हिंगोली) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गु.रं.न. ३२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३७(२), ८७ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेतील वाहन चालकांचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट करत आहेत. विशेष म्हणजे कमी मनुष्यबळ, वाढता कामाचा ताण आणि मर्यादित संसाधने असूनही पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडस अत्यंत कौतुकास्पद असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
या निमित्ताने पोलिसांनी पालकांना आपल्या मुलांबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसताच तात्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रसंगी नागरिकांची तत्पर माहिती ही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
