मेंगाळवाडीच्या आदिवासी कन्येचा राज्यस्तरावर झेंडा; कु. राजश्री गांडाळ ठरली ‘सफायर आयडॉल’

दिनांक. 26 फेब्रुवारी 2026

संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत दैदिप्यमान यश; गावात जल्लोषात सत्कार

लायन्स क्लब ऑफ संगमनेर आयोजित राज्यस्तरीय ‘लायन्स क्लब सॅफ्रॉन सफायर सोलो सिंगिंग स्पर्धेत’ संगमनेर तालुक्यातील मेंगाळवाडी गावची आदिवासी कन्या कु. राजश्री भाऊसाहेब गांडाळ हिने आपल्या सुरेल आवाजाने परीक्षक व रसिकांची मने जिंकत ‘सफायर आयडॉल’ हा बहुमान पटकावला. तिच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी अभिमान व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने सातत्याने विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून पार पडलेल्या या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत कु. राजश्री हिने अत्यंत आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.

या उल्लेखनीय यशाबद्दल मेंगाळवाडी येथे लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब मित्र मंडळ, श्री ओम साई आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वाघोबा मित्र मंडळ, ओम साई महिला बचत गट, भगवती माता महिला मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जय हिंद आदिवासी आश्रमशाळा, कोळवाडे येथील मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांच्या शुभहस्ते कु. राजश्री गांडाळ हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या पालकांचाही विशेष सत्कार करून आदर्श पालकत्वाचा गौरव करण्यात आला.

प्रमुख वक्त्यांनी आपल्या मनोगतातून कु. राजश्रीच्या मेहनतीचे, जिद्दीचे व सातत्याचे कौतुक करत तिच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण व कला क्षेत्रात पुढे यावे, यासाठी अशा यशकथा प्रेरणादायी ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकारी व ग्रामपंचायत स्तरावरील मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण गावात आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.

कु.राजश्री गांडाळ हिच्या या यशाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष सौ. मैथिली तांबे आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!