दिनांक. 26 फेब्रुवारी 2026
अधिवेशनात मुद्दा गाजला; सरळ, कमी अंतराचा आणि जनहिताचा मार्ग ठरवण्यासाठी तज्ञ समितीचा निर्णय
संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी नैसर्गिक आणि सरळ मार्ग निश्चित करण्याच्या मागणीला अखेर निर्णायक वळण मिळाले असून, आमदार सत्यजित तांबे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तज्ञ समिती नेमण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यामुळे नाशिक–पुणे रेल्वे सरळ मार्गासाठी सुरू असलेल्या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे.लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वेचा सरळ आणि नैसर्गिक मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मार्ग बदलण्याबाबत संभ्रम निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा करत विधान परिषदेत हा प्रश्न प्रभावीपणे मांडला.
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करताना आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले की, नियोजित सरळ मार्ग बदलण्यामागे जीएमआरटीचे कारण पुढे करण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात संबंधित संस्थेकडून कोणतेही अधिकृत तांत्रिक मत मागवले गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा निर्णय पुनर्विचारासाठी घ्यावा आणि सरळ मार्ग कायम ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे पुन्हा प्रस्ताव पाठवण्यात येणार असून, या क्षेत्रातील तज्ञांची समिती स्थापन करून सरळ, कमी अंतराचा आणि सर्वसामान्यांना सोयीचा मार्ग निश्चित करण्याचा सविस्तर अभ्यास केला जाईल. या प्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे नाशिक, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, जुन्नर, नारायणगाव, खेड, चाकण आदी मार्गावरील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
